Wednesday, June 29, 2016

इच्छा

मला काय ठाव
तो एक गाव
जाऊन जिथे मी शांत
निजणार...

डोळयात प्राण,
तुझं गावठाण,
आठवणीत सय माझी
भेटणार...

सांगुन टाक
उरलेली राख
रांगोळी हृदयावरची
दिसणार...

-अभि

Friday, July 17, 2015

बाबा माझी तुम्हाला शब्दांजली!


ऋतु सांडत जातील पाणी, 
माेकळी ठेव ओंजळ तु,
डाेळयात वने जपलेली
एवढीच ठेव ओळख तु.

काेपरयात पडले आहे
सौजन्य केविलवाणे,
आहे उजवीत काक
नवहुॅंकाराचे गाणे.

दोष गवयाचा होता की
भाता चुकला पेटीचा,
मैफलीत घुमतो आहे
सुवास त्या भेटीचा.

- तुमचा मुलगा
अभि

Wednesday, June 3, 2015

वारा

इथे ईस्ट कोस्ट्वर उन्हाळा लागला कि इकडे तिकडे फिरण्याचे वेध लागतात. मागच्याच आठवड्यात आम्ही सगळे रोड आयलँड नावाच्या ठि़काणी गेलो. तसे आम्ही आधी इथे आलो होतो पण नविन मित्राबरोबर पुन्हा एकदा आलो. इथे समुद्रकिनार्‍याला लागुनच एक पाऊलवाट बनवली आहे साधारण ४ मैंलाची असेल. आम्ही त्यावरुन चालायला साधारण भर उन्हात १.३० वाजता सुरु केले. पण उन्हाने आणि जोरदार वार्‍याने थोड्याच वेळात आमची अवस्था वाईट केली. आम्ही रडत खडत चालत होतो आणि कधी आम्ही एकदाचे होटेलमधे पोचतोय असं झालं. 

अचानक चालता चालता एक म्हातारा चित्रकार चित्र काढताना दिसला. सर्वजण पुढे गेले आणि मी जरा रेंगाळत बसलो. त्याची विचारपुस केल्यावर कळले कि हा ऐंशी वर्षाचा जख्खड म्हातारा त्या भर उन्हात आणि जोरदार वार्‍यामधे हसतमुखाने चित्र काढत उभा होता. 

आम्हाला त्या वार्‍याचा इतका त्रास होत होता त्याला तर होतच असणार. "तुम्हाला वार्‍याचा त्रास नाही होतं, चित्र काढताना?" मी निरागसपणे विचारले. तो हसला आणि म्हणाला "जर जोरदार वारा नसेल तर मग समुद्रामधे लाटा निर्माण कशा होणार? आणि जर लाटाच नसतील तर मग मी चित्र कशाचे काढु!"
नकळत माझ्या चेहर्‍यावर हसु आले आणि मी चालु लागलो.

-अभि

Thursday, May 14, 2015

टॅलकोट माऊंटन आणि व्हेदर्सफिल्डचा तलाव

हार्टफोर्ड मधल्या माझ्या दोन आवडत्या जागा. टॅलकोट माऊंटन आणि व्हेदर्सफिल्डचा तलाव. 

टॅलकोट माऊंटन म्हणजे आपली पुण्याची पर्वती किंवा कदाचित थोडीशी त्याहुन उंच. पण संध्याकाळी इतका सूंदर निसर्ग दिसतो कि डो़ळ्यांचे पारणे फिटते.
 आणि दुसरी जागा म्हणजे व्हेदर्सफिल्डचा तलाव.

Thursday, January 1, 2015

आणि हरवलेला कुंचला सापडला....

लहानपणी माझी चित्रकला चांगली होती असे बरेच जण म्हणायचे. कॅमल चे पोस्टर कलर घेउन तासंतास चित्र काढत बसायचो. मोठ्यामोठ्या लोकांची तैलचित्र पाहुन वाटायचे कि एके दिवशी आपणपण असे चित्र काढु. पण शाळा सुटल्यापासुन चित्रकलेशी काहीच संबंध राहिला नाही. पण योगायोगाने मागच्या वर्षी एका सामुहिक चित्रकलेच्या वर्गात गेलो आणि बर्‍याच वर्षानंतरची चित्रकलेची अपरी इच्छा पुर्ण झाली. जवळ जवळ १४ वर्षांनी माझ्या बोटांनी हातात कुंचला धरला. 

माझे कॅनव्हास वरिल पहिले चित्र.

आणि त्यानंतर पुन्हा उर्मी निर्माण झाली. तसाच इथे अमेरिकेत कडक हिवाळा होता त्यामुळे थंडी बरीच होती त्यामुळे घरीच बसुन होतो, वेळही होता. त्यामुळे बरिच चित्र काढली. आता पुढचा प्रोजेक्ट म्हणजे कॅनव्हास वर वारलि चित्रकला. लवकरच त्याचे हि फोटो टाकतो.
तुम्हाला हि चित्र आवडली तर नक्की कळवा.

-अभिजीत